श्री संगमेश्वर

सासवड किल्ले पुरंदर मार्गावर पंचकमानी पुलावर उभे राहून पश्चिमेस नजर टाकली असता जे नयन मनोहर रमणीय दृष्य दिसते, ते पाहून कोणीही पुलकित होईल. एका बाजूने कर्‍हामाई व दुसर्‍या बाजूने भोगावती यांच्या सुंदर संगमावर हे प्रेक्षणीय शिवालय उभे आहे.

नावः
श्री संगमेश्वर

ठिकाणः सासवड

अंतरः सासवडपासून १ किमी.

कसे जाल? सासवडहून रिक्षा उपलब्ध

चित्रदालन पहा

सासवड किल्ले पुरंदर मार्गावर पंचकमानी पुलावर उभे राहून पश्चिमेस नजर टाकली असता जे नयन मनोहर रमणीय दृष्य दिसते, ते पाहून कोणीही पुलकित होईल. एका बाजूने कर्‍हामाईचा पवित्र प्रवाह व दुसर्‍या बाजूने भोगावतीचा (चांबळी) प्रवाह यांच्या सुंदर संगमावर हे प्रेक्षणीय शिवालय उभे आहे. दोन नद्यांच्या संगमावर ते उभे असल्याने त्यास ‘संगमेश्वर’ मिळालेले नामानिधान यथार्थ नाही असे कोणास वाटेल?

संगमेश्वराचे मंदिर म्हणजे पेशवेकालिन शिल्पाचा नि स्थापत्य कलेचा आदर्श नमुना होय. मंदिरात जाण्यासाठी विशाल दगडी घाटाच्या पायर्‍या चढून वर जावे लागते. आणि मग लागतो मंदिराचा चौकोनी आकारचा प्रशस्त दगडी प्राकार. प्रवेशद्वार ओलांडले की, तीस दगडी स्तंभावर उभारलेला प्रवेशमंडप नजरेत भरतो. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस कृष्ण पाषणाच्या दीपमाळा प्रवेशसमई चित्त वेधून घेतात. अभंग दगडी स्तंभावर उभारलेला हा प्रवेशमंडप रम्य भासतो. प्रवेशमंडपात घोटीव देखण्या नंदीची मूर्ती असून तिच्या पाठीवर दोन नागफण्या कोरलेल्या आहेत.

नंदीवरील कोरलेला साजशृंगार रसिक मनाला मोहवितो. मध्यमंडपाचे प्रवेशद्वाराचे स्तंभावर चित्रविचित्र, सुंदर, सुबक नक्षीकाम कमलपुष्पे, कलाकुसारीच्या वेलबुट्ट्याकृती घाटदारपणे कोरलेल्या आहेत. मंडपात वामांगी श्री गणेशमूर्ती व दक्षिण बाजूस श्री हनुमान मूर्ती दिसते. मग लागतो तो मध्यम मंडप. मध्य मंडपाच्या केंद्रस्थानी दगडी कासव कोरलेले आहे. मंडपात दक्षिणोत्तर दोन प्रवेशद्वारे आहेत. मंडपातील स्तंभावर जयविजय मूर्ती कोरलेल्या दिसतात. गर्भगाराच्या दगडी चौकटीवर व त्याशेजारील स्तंभावर वेलबुट्ट्यांचे मनोहर नाजूक नक्षीकाम मनोवेधक आहे.

मंदिराचे दक्षिणेस घाट व कर्‍हातीर आहे. घाटावर खडकेश्वर मंदीर व सतींची समाधी मंदिरे दिसतात. मागील पश्चिम बाजूस उद्यानाची जागा आहे. उत्तरेस भोगावती प्रवाह वाहतो. पश्चिमेच्या बाजूस देवालयाच्या दक्षिणोत्तर टोकास दोन शिवालये उभी आहेत संगमेश्वर देवलायाच्या मागील बाजूच्या स्तंभाकृतीवर चित्रविचीत्र अन् सुबक रेखीव नक्षी काम, चक्रे व घाटादार कोरीव काम पाहून मन वेडावून जाते. शिवालयाच्या दक्षिणेस दगडी धर्मशाळा आहे व वृंदावन आहे.

अशा या निसर्गरमणीय व देखण्या स्थळाचा उपयोग अनेक चित्रपटनिर्मात्यांनीही करुन घेतला आहे. मंदिराचे सौंदर्य सुरम्य स्वनाप्रमाणे मोहक भासते. आणि पोर्णिमेच्या शीतल चंदेरी जोत्स्ना प्रकाशात मंदिराची शोभा आगळी व अवर्णनीय दिसते. त्रिपुरी पौर्णिमेच्या संगी अनेक दीपावलीच्या शांत न सौम्य प्रकाशाने मंदिराजवळ कर्‍हेचा घाट तेजाने खुलतो आणि कर्‍हामाईच्या प्रशांत निर्मल जलशयात संगमेश्वराचे देखणे मनोहर प्रतिबिंब पडते अन् वाटते…” स्वछंद मनाने इथेच किती विहरावे | अन माझे मी पण तुझ्यात विसरुनी जावे .”