वसुंधरा प्रतिष्ठान, सासवड

ग्लोबल वॉर्मिंग आणि निसर्गाचा बिघडत चाललेला समतोल यासाठी आपण काय करतोय ???

प्रचंड प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवणे आपल्या हातात नसले तरीही प्रत्येकाने वृक्षारोपण करणे जरुरीचे झाले आहे. पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून वृक्ष लागवड या विषयाला सर्वच पातळीवर प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते.

देश आणि राज्य सरकारद्वारे वृक्षारोपणाच्या विविध मोहिमा हाती घेण्यात आल्या असल्या तरीही आपणही देशाचे काहीतरी देणे लागतो याच विचारातून जन्म झाला तरुण ‘वसुंधरा प्रतिष्ठान’ संस्थेचा. वृक्षारोपनाद्वारे पुरंदर तालुका हरितमय करण्याचा मानस वसुंधरा प्रतिष्ठानाचा आहे. या प्रतिष्ठानाचे सर्व तरुण कार्यकर्ते आपले महाविद्यालयीन शिक्षण करता-करता पर्यावरणाच्या संतुलनासाठी कार्य करतात. पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबवण्यासाठी वृक्षारोपणची नितांत आवश्यकता लक्षात घेऊन प्रतिष्ठान राबवीत असलेला हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने दहा शाळांना झाडे दत्तक देण्यात येणार आहे. जी शाळा सर्वात जास्त झाडे जगवतील त्या शाळेला प्रतिष्ठानातर्फे बक्षीस देण्यात येणार आहे. वसुंधरा प्रतिष्ठानाचे अध्यक्ष अविराज खेनट हे त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती देताना म्हणतात, ‘ आम्ही वृक्षारोपण करताना काय काळजी घ्यावी, कोणत्या प्रजातींची झाडे लावावीत, त्यांची जोपासना कशी करावी, कोणत्या रस्त्याच्या कडेला कोणती (किती वाढणारी) झाडे लावावीत हे सर्व शाळेतल्या मुलांना तसेच शिक्षकांना सांगतो. तसेच प्रत्येक महिन्याला वृक्ष रोपांची वाढ नीट होते आहे की नाही याची सुद्धा काळजी आमचे कार्यकर्ते घेतात.’

अध्यक्ष अविराज खेनट, सचिव अमोल जगताप, अभिजीत जगताप, किशोर काळे, कुंडलिक काळे, योगेश काळे, सुधीर बोरकर, किशोर ढमढेरे, योगेश कामठे, एकनाथ खामकर हे आणि असे अनेक तरुण ‘वसुंधरा प्रतिष्ठान’ सारख्या प्रकल्पातून प्रत्येक भारतीय नागरिकासमोर एक आदर्श निर्माण करीत आहेत.