नन्ही दुनिया- राजीव साबळे फौंडेशन

मुलं म्हटलं की आठवतं निरागसपणे फुलणं आणि त्या फुलण्याचे अनेकविध पैलु म्हणजे त्यांची शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि आत्मिक वाढ. एवढच नव्हे तर त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा विकसित होणं त्यांना सामाजिक बांधिलकीची जाण येणं. सर्वच मुलं निरागस असतात आणि सर्वांनाच असायला हवा समान हक्क! तो हक्क त्यांना मिळवून देण्याच्या जाणिवेतून ‘राजीव साबळे फौंडेशन’ यांनी ही जबाबदारी स्विकारायचं ठरवलं.

“कोणत्याही समाजाच्या नैतिकतेची परिक्षा तो समाज त्या मुलांसाठी काय करतो यावरून होते.” असं म्हटलं जातं मुलं ही देशाची खरी संपत्ती आहे. त्यांना विकासाची संपूर्ण संधी मिळवून देणं, त्यांचं भविष्य उज्ज्वल बनविणे हे आपले ध्येय मानून ‘राजीव साबळे फौंडेशन’नं सासवड येथे ‘नन्ही दुनिया’ या नावाचं एक कायमस्वरुपी केंद्र उभं केलं आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाला आपला पाल्य केवळ अभ्यासात नव्हे तर इतर विविध कौशल्यांमधेही, इतर मुलांपेक्षा प्रविण असावा अशी अपेक्षा असते. त्यामुळे कळत-नकळत या कोवळ्या वाढीच्या वयातच या मुलांवर अनेक प्रकारची दडपणे येतात. त्यांच्यावरचा मानसिक ताण वाढत जातो. त्यांच्या आवडी निवडींकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मुलांमध्ये वैफल्य निर्माण होऊन त्यांचा सर्वांगीण विकास खुंटु शकतो.

या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि त्याना विविध क्षेत्रात चमकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजीव साबळे फौंडेशन कार्यरत आहे. खेळातून शिक्षण व विविध बौद्धिक खेळाच्या माध्यमातून त्यांची अभ्यासासी आवड आणि एकाग्रता वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे शारीरिक, भावनिक, संस्कृतिक, आत्मिक विकास, एवढेच नव्हे तर, सामाजिक बांधिलकी त्यांच्यात निर्माण व्हावी, यासाठी विविध प्रकल्प त्यांच्या पालकांना व सामाजिक वातावरणाला अनुसरून संस्था राबवत आहे.