पुरंदरे वाडा

शिवशाही व पेशवाईच्या ऐतिहसिक खुणा मध्ये किल्ले पुरंदरे व नजीकच्या सासवडचा कर्हेकाठ खूप महत्त्वपूर्ण आहे. येथील सासवड नगरीतील जुन्या एक – एका वाड्याला तेवढीच ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे पुण्याचा शनिवारवाडा ज्या वाड्याच्या रचनेवरून बेतला… तो शनिवारवाडाच्या अगोदर वीस वर्ष बांधलेला येथील ‘आबासाहेब पुरंदरे वाडा’ म्हणजे या नगरीची चिरेबंदी सौदंर्यच आहे!

नावः पुरंदरे वाडा
ठिकाणः सासवड

अंतरः सासवडपासून १ किमी.

कसे जाल? सासवडपासून रिक्षा उपलब्ध

आबासाहेब पुरंदरे वाड्याचे पुढे खिंडार पडले व थोडी पडझड झाली, तरी काही भाग सुस्थितीत आहे. तटबंदी मजबूत आहे. त्यामुळे आताचे मालक जय पुरंदरे करू इच्छित असलेले ऐतिहसिक संग्रहालय या वाड्यात साकारले, तर पुन्हा या वैभवला झळाळी मिळेल!!

कर्हेकाठवरील पुरंदरे घराण्याचे संस्थापक व पेशव्यांचे दिवाण अंबाजीपंत पुरंदरे यांनी १७१० मध्ये हा पुरंदरे वाडा बांधला. ते साताराचे शाहू महाराज यांचे मुतालिकही होते. शिवाजी महाराजांच्या काळात कुलकर्णी वतनदार म्हणून त्रिंबक पुरंदरे होते. शाहूंना गादीवर बसविण्यात या अंबाजीपंत पुरंदरे यांनी बाळाजी विश्वनाथ भट (पेशवे) यांच्यासह आघाडी घेतली होती. हा पुरंदरे वाडा चार एकर क्षेत्रावर सात चौकी पद्धतीने बांधला आहे. चाळीस हजार चौरस फुटाचे बांधकाम यात आहे. तीनशे वर्षापुर्वी कर्हेकाठाची खडकाळ जागा खास निवडून हा चिरेबंद तटबंदीचा व आत चारमजाळी असलेला वाडा बांधला.

पुरंदरे यांचे पूर्वज पुर्वी हत्तिवरुन अंबारीतून यायचे. त्यामुळे बाहेरचा मुख्य दरवाजा अंबारीसह हत्ती आत येईल, एवढा होता. एखाद्या किल्ल्याचे वा गढीचे प्रवेशद्वार वाटावे असे या वाड्याचे आतील मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याला बुरूज, दगडात कोरलेल्या निरक्षण खाचा, लाकडी दारावर लोखंडी संरक्षक भलेमोठे खीले, दगड – लाकूड – लोखंड – शिसे यांचे जोड प्रत्येक ठिकाणी आजही मजबूत आहेत. वाड्यात जेवढे बांधकाम वर दिसते. तेवढेच जागा तळघरांनी व्यापली आहे. वाड्यात आड, विहीर, भुयारे, टेहळणी मनोरे चार दिशेला चार आहेत. ते आजही दिसतात. फक्त भुयारे कुठपर्यंत जातात, याची खात्री झाली नाही. तीनशे वर्षापूर्वीची रंगीत भित्तीचित्रे आजही आहेत; असे जय पुरंदर यांनी सांगितले आहे. त्यांच्या बंधुनी वाड्याचा काही निकामी भाग उतरविला. तो भाग वगळता इतर ठिकाणी वास्तु उभी आहे.

याची दुरुस्ती करून व काही भागाचे नूतनीकरण करून येथे शिवशाहीर आबासाहेब पुरंदरे यांच्या सल्ल्याने ऐतिहसिक संग्रहालय करण्याचा मनोदय व्यक्तीगतरित्या जय पुरंदरे यांनी व्यक्त केला.