मल्हारगड

महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्ये सर्वात शेवटी बांधला गेलेला म्हणून ‘मल्हारगड’ प्रसिद्ध आहे. मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकारचा असून आतील बालेकिल्ल्याला चौकोनी आकारचा तट आहे. मल्हारगड आकाराने लहान आहे. पुण्याहून सासवडला जाताना लागणार्‍या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली.

नावः मल्हारगड

ठिकाणः सोनोरी, सासवड

अंतरः सासवडपासून ५ किमी

कसे जाल? सासवडहून सोनोरी बससेवा

पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे वेल्हे तालुक्यातून सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात एका डोंगररांगेवर राजगड आणि तोरणा तर दुसरी डोंगररांग ही पूर्व-पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेला भुलेश्वर रांग म्हणतात. पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, सिंहगड याच रांगेवर वसलेले किल्ले आहेत. या किल्ल्याची निर्मिती इ. स. १७५७ ते १७६० या काळातील आहे. पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावामुळे या गडाला ‘सोनोरी’ म्हणूनही ओळखले जाते.

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे
पूर्वेकडच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर डाव्या बाजूने पुढे गेले असता बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात. बाजूलाच एक विहीर आहे. बालेकिल्ल्यात प्रवेश न करता तटाच्या बाजूने पुढे गेल्यावर समोरच एक तळे लागते. किल्ल्याच्या दक्षिणेला असणारे हे तळे तटाला लागूनच असून पावसाळ्यात व हिवाळ्यात पाण्याने भरलेले असते. यातील पाणी वापरण्यास उपयुक्त असले तरी पिण्यायोग्य मात्र नाही.

असेच पुढे किल्ल्याच्या टोकावर असणार्याप बुरुजाकडे जाताना अजून एक विहीर लागते. या विहीरीतही पाणी नाही. या बुरूजाच्या खाली एक बुजलेला दरवाजा दिसतो. या बुरुजाकडून उजवीकडे पुढे गेल्यावर आपल्याला आणखी एक अतिशय लहान दरवाजा दिसतो. झेंडेवाडीकडून आल्यास आपण या दरवाज्यातुन किल्ल्यात प्रवेश करतो. बालेकिल्ल्यात दोन मंदिरे आहेत. यातील लहान देऊळ खंडोबाचे आणि दुसरे जरा मोठे देऊळ महादेवाचे आहे. बालेकिल्ल्याच्या उत्तरेला प्रवेशद्वार आहे.

गडाकडे जाण्याआधी सोनोरी गावात असणारा पानसे यांचा ६ बुरुजांचा वाडा पाहण्यासारखा आहे. एखाद्या गढीप्रमाणे असणार्याय या वाड्यात गजाननाचे व लक्ष्मी – नारायणाचे मंदिर आहे. सोनोरी गावात चुकवून चालणार नाही असे ठिकाण म्हणजे मुरलीधराचे सुबक मंदिर व मंदिरातील अत्यंत देखणी अशी काळ्या पाषाणात घडवलेली श्रीकृष्णाची मूर्ती.

गडावर जाण्याच्या वाटा

  1. पुण्याहून: पुण्याहून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो. येथून २ कि. मी. वर झेंडेवाडी गाव आहे. गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगर रांगांमध्ये दिसणार्‍या ‘ण’ आकाराच्या खिंडीत जावे लागते. या खिंडीत गेल्यावर समोरच आपल्याला मल्हारगडचे दर्शन घडते. खिंडीतून किल्ल्यावर जाण्यास अर्धा तास लागतो. झेंडेवाडी फाट्यापासुन खिंड पार करून किल्ल्यावर जायला साधारणपणे दीड तास लागतो.
  2. सासवडहून: सासवड पासून ६ कि. मी. वर ‘सोनोरी’ हे गाव आहे. या गावाला दिवसातून तीन वेळा जाते. सोनोरी गावातून समोरच मल्हारगड दिसतो. सोनोरी गावातून किल्ल्यावर जाण्यास अर्धा-पाऊण तास लागतो. डोंगराच्या सोंडेवरुनही गडामध्ये प्रवेश करता येत असला तरी टॉवरच्या बाजूने गेल्यास आपल्याला किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार लागते.

राहण्याची सोय

फक्त ५-६ माणसे महादेवाच्या मंदिरात दाटीवाटीने राहू शकतात. गडावर अन्यत्र राहण्याची सोय नाही. मात्र पायथ्याला असणार्‍या सोनोरी गावात किंवा झेंडेवाडीत शाळेच्या आवारात राहता येते. सासवड येथे राहण्याची सोय होऊ शकते.

जेवण्याची सोय

जेवण्याची सोय स्वतः करावी. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.