आचार्य अत्रे याना आदरांजली म्हणून कर्जातून ग्रंथालय

जनसेवेसाठी आणि वाचकांचमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथालय चळवळ वाढीस लागावी या उदात्त हेतूबरोबरच साहित्यसम्राट आचार्य प्र. के. अत्रे यांना अनोखी आदरांजली वहावी, म्हणून सासवड येथील युवक तानाजी किसनराव सातव यांनी बॅंकेचे कर्ज काढून ग्रंथालय उभारले आहे. बेरोजगारीवर मात करून प्रगतीकडे झेप घेणार्‍या या नवयुवकाने आपल्या या ग्रंथालयाला नाव दिलेले आहे ‘प्रगती ग्रंथालय’.

पेट्रोल पंपावरील कामगारापासून ते उद्योगपतींपर्यंत सर्वांना आवडीच्या वाचनाचे खाद्य पुरविणारे हे ग्रंथालय २१ नोव्हेंबर १९९७ रोजी आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी वर्षात सुरू करण्यात आले. या ग्रंथालयाने प्रगतीची घोडदौड करता करता समाजसेवेचा वसाही मनापासून जपला आहे. पूणे विभागात शालांत परीक्षेत दहावा आलेल्या कौस्तुभ धारवाडकरचा रणजीत देसाई लिखीत ‘स्वामी’ कादंबरी देऊन गौरव केला तर, बालवाचकांसाठी सवलतीत बालवाङ्मय उपलब्ध करून दिले. १०वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची सामान्यज्ञान परीक्षा पुरंदरे प्रकाशनाच्या ‘राजा शिवछत्रपती’ ग्रंथाची नावनोंदणी याचबरोबर जिल्हापातळीवर ‘अत्र्यांचा एक विनोद’ स्पर्धा वाचकांच्या दमदार प्रतिसादाबरोबर आयोजण्यात प्रगती ग्रंथालय व तानाजी सातव यांचा तोलामोलाचा वाटा होता.

आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल बोलताना तानाजी सातव म्हणतात, ‘मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. मला कामासाठी नोकरीसाठी खूप वणवण करावी लागली. आचार्य अत्रे यांची जन्मशताब्दी त्यावेळी सुरू होती. आचार्य अत्रे यांना व्यक्ती, संस्था, शासन यांच्याकडून विविध उपक्रमांद्वारे मोठयाप्रमाणात आदरांजली वाहण्यात येत होती. बेरोजगारीचे शस्त्र मी आत्मविश्वासाने हातात घेतले. पंतप्रधान रोजगार योजनेअंतर्गत पुणे जिल्हा उद्योग केंद्राकडे २५ हजाराचे मी अर्थसहाय्य मागितले. जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी भोसले व बँक ऑफ इंडिया शाखा सासवडचे शाखाधिकारी दिलीप आबनावे यांनी या उपक्रमाला मनापासून दाद देत सर्वतोपरी मदत केली. बँक ऑफ इंडियाने मला ९५ टक्के कर्ज पुरवठा त्वरीत करून माझे स्वप्न पुरे करण्यात मोलाची मदत केली.’

सासवड येथील दौलत चित्रमंदिराचे मालक अशोक उर्फ तात्यासाहेब खाटपे यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून दिली. लेखक बाळकृष्ण जांभळे यांच्या हस्ते ग्रंथालयाचे उद्घाटन केले. राजकारण, समाजकारण, अर्थ, इतिहास, विज्ञान यावरच्या ६०० पेक्षा जास्त कथा कादंबर्‍या येथे आहेत, त्याशिवाय अनेक साप्ताहिके, मासिके, पाक्षिके, वर्तमानपत्रे नियमित येथे येतात. बँकेच्या मोलाच्या हातभाराला, देवाचा आशिर्वाद समजून आपल्या प्रयत्नांला खडतर कष्टाची जोड देऊन तानाजी सातव यांनी बँकेचे कर्ज फेडले. वाचक चळवळीला वाढविण्याचा सतीचा वसा घेतलेले तानाजी सातव आपल्या पुढील उपक्रमाबद्दल बोलताना म्हणाले की, ‘प्रगती ग्रंथालयाद्वारे आम्ही पुढील काळात कथाकथन, नाटके यांच्या ध्वनीफिती तसेच पुस्तके वाचकांना घरपोच देणार आहोत. याशिवाय विविध विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. शिवाय वाचकांना वार्षिक शुल्कात सवलतही देण्यात येणार आहे.