‘वाय’ उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ

हडपसर - सासवड रस्ता व गाडीतळ भागातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालिकेच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या वाय आकाराच्या उड्डाणपुलाच्या कामाला सुरवात झाली आहे.

पालिकेच्या वतीने देण्यात आलेले काही गाळे व खासगी मिळकतींना या पुलामुळे हटवावे लागणार आहे. त्यामुळे दुकानमालकांनी हरकत घेतली आहे. मात्र कोणाही मिळकतीच्या मालकाचे नुकसान होऊ दिले जाणार नाही. नियमानुसार त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी आश्‍वासन दिले आहे. या कामासाठी निधी कमी वेळेत उपलब्ध करून देण्याबाबतचा ठराव मुख्य सभेत मंजूर झाल्याने पुलाचे काम वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे.

पुलाच्या कामासाठी २४ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. महापालिकेच्या सार्वजनिक वाहतूक सुधारणा व विशेष प्रकल्प विभागाअंतर्गत उपलब्ध निधीतून जुन्या जकात नाक्‍याजवळून सोलापूर महामार्ग, सासवड रस्त्यावरील कालव्यापासून जुन्या अर्थात सध्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपुलास जोडण्यासाठी असे दोन उड्डाणपूल बांधण्याचा यात समावेश आहे.

त्यातील पहिल्या उड्डाणपुलाची लांबी ६७५ मीटर व दुसऱ्या पुलाची लांबी ३१० मीटर व रुंदी ७.५ मीटर अशी प्रस्तावित आहे. पुणे सोलापूर रस्त्यावरील, तसेच गाडीतळ येथील चौकातील होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी या पुलाचा प्रामुख्याने उपयोग होणार आहे.

या प्रस्तावित पुलापैकी एक उड्डाणपूल गाडीतळजवळील अग्रवाल स्वीटपासून या पुलाला समांतर असेल. पहिला उड्डाणपूल सासवड रस्त्याकडेला कालव्याजवळ उतरणार आहे, तर दुसरा उड्डाणपूल सासवड रस्त्यावरील कालव्यापासून पुण्याकडे जाणाऱ्या जुन्या उड्डाणपुलाला मिळणार आहे.

सासवड फाट्यावरील दोन उड्डाणपुलामुळे जुन्या उड्डाणपुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होऊन हडपसर गाव, गाडीतळ येथील वाहतुकीची कोंडी कमी करण्यात मदत होईल व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे परिसरातील शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांना वहिवाट करताना दिलासा मिळणार आहे. हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यास एकेरी वाहतुकीमुळे सत्यपूरम ते भैरोबा नाला येथपर्यंतचा प्रवास कमी बिनदिक्कत होऊ शकतो व या भागाच्या विकासाला चालना मिळू शकते.