पुरंदरला पाणी टंचाईचे संकट तीव्र

सासवड – पुरंदर तालुक्‍यातील लहान धरणे, बंधारे व लघू पाटबंधारे प्रकल्प, तलावांतील पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली आहे. सासवड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कऱ्हा नदीवरील गराडे लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या जलाशयात तर फक्त 6.40 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यामुळे सासवडचे पाणी बंद झाल्यात जमा आहे. हा जलाशय 65.37 दलघफू क्षमतेचा असून गतवर्षी याच काळात त्यात 22.75 दलघफू पाणीसाठा होता. यंदा मृत साठ्याच्या खाली पातळी गेली आहे. सुपे खुर्द येथील घोरवडी जलाशयात 10.24 दलघफू पाणी आहे. गतवर्षी याच्या दुप्पट साठा होता. “पाटबंधारे’चे शाखा अभियंता शहाजी सस्ते यांनी याबाबत माहिती दिली.

वीरनाला तलाव 91.21 दलघफू क्षमतेचा असून त्यात 22 दलघफू पाणीसाठा आहे. गतवर्षी हा साठा दुप्पट होता. पिलाणवाडी जलाशयाची क्षमता 69.22 दलघफू असून त्यात सध्या 22.5 एवढा साठा आहे. गतवर्षी यात 39.06 दलघमी एवढा साठा होता. माहूर जलाशयात 33 दलघफू साठा आहे. गतवर्षी तो 47 दलघमी होता. पिंगोरी जलाशयात आज केवळ 1.30 दलघफू पाणीसाठा आहे. गतवर्षी हा साठा 10.80 एवढा होता. पिसर्वे तलावाची स्थितीही अशीच आहे.

या जलाशयांवर शेती, विहीर सिंचन, पिण्याचे पाणी आदी बाबी अवलंबून आहेत. हे जलाशय आटल्याने तालुक्‍यातील पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे टॅंकरची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.

“मल्हासागर’ मृतसाठ्याच्याही खाली…
“कऱ्हे’वरील नाझऱ्याचे “मल्हारसागर’ धरण 788 दशलक्ष घनफूट क्षमतेचे असून त्याची मृतसाठ्याची पातळी 200 दलघफू एवढी आहे. मात्र, धरणात आज 183 दलघफू साठा आहे. ही पातळी मृतसाठ्याच्याही खाली असून, धरणावर पुरंदर व बारामती तालुक्‍यातील 42 गावे पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत.