सूर्यनारायणाने घेतले भुलेश्‍वराचे दर्शन

भुलेश्‍वर। दि. २७ मार्च २०१२

पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथील हेमाडपंती श्रीक्षेत्र भुलेश्‍वर येथे सूर्याचा उगवणारा किरण गाभार्‍यातील मुख्य शिवलिंगावर पडला व पाहणार्‍या शिवभक्तांचे डोळ्यांचे पारणे फिटले. साक्षात सूर्यनारायणाने दि. २७ मार्च २०१२ रोजी ६.३५ ते ६.५० मिनिटांपर्यंत भुलेश्‍वराचे दर्शन घेतले.

श्रीक्षेत्र भुलेश्‍वर हे हेमाडपंती मंदिर असल्याने मुख्य गाभारा, ध्यानमंडप, नंदीमंडप व त्यासमोर नगारखाना आहे. नगारखाना ते मंदिराच्या मुख्य गाभार्‍यातील शिवलिंग यांचे अंतर ८० फुटांपर्यंत आहे. दि. २७ मार्च २०१२ रोजी सकाळी ६.३५ मिनिटांनी मंदिराच्या नगारखान्यापासून शिवलिंगापर्यंत ८० फुटांवर मुख्य शिवलिंगावर सूर्याचे किरण पडले व भुलेश्‍वराचे सोनेरी मूर्ती झाल्यासारखे वाटले.

येथील पुजारी श्री. विजय गुरव म्हणाले की, सूर्यकिरण व शिवलिंग भेट वर्षातून दोनदा होते. पहिली भेट सप्टेंबर महिन्यात येते परंतु यावेळी पावसाळा व ढगाळ हवामानामुळे अनेक वर्षे या महिन्यात असा योग येत नाही. गेल्या दहा वर्षात १७ सप्टेंबर २००७ रोजी हा योग आला होता. त्यानंतर आजतागायत असा योग आला नाही. मार्च महिन्यात असा योग यंदा लिप वर्षी २८ मार्चला  येणार होता मात्र सूर्यनारायणाने एक दिवस अगोदरच म्हणजे २७ मार्चलाच भुलेश्‍वराचे दर्शन घेतले.

सूर्याचे पहिले किरण शिवलिंगावर पडावे म्हणून मंदिरातील महाकाय नंदीची मान उजवीकडे वळवण्यात आली आहे अशी या मंदिरात रचना करण्यात आली आहे.

- दै. लोकमत