पुरंदरच्या शेतीला मिळणार जादा पाणी

शहराची पाण्याची वाढती मागणी असल्याने जिल्ह्यातील शेतीच्या पाण्यावर फार मोठा ताण पडत असून, प्रसंगी शेतीच्या पाण्यात पाटबंधारे विभागाला कपात करावी लागत आहे. त्यातच बाष्पीभवन, पाणी चोरी, पाणीगळतीमुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता दिवसेंदिवस कमी होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान भूमिगत जल बोगदा बांधण्यासाठी पाटबंधारे विभागाने गांभीर्याने विचार सुरू केला असून, दक्षिण पुण्याच्या हद्दी जवळील गावाजवळून बोगद्यासाठी जागा (साइट) निश्‍चित करण्यात आली आहे. यामुळे दौंड, इंदापुर, पुरंदर, हवेली तील शेतीसाठी २.९१ टीएमसी पाणी अधिक उपलब्ध होणार आहे.

पुणे शहराला वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणांची २९.१६ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी साठविण्याची क्षमता आहे. शहराला प्रति महिना सरासरी सव्वा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. म्हणजेच शहरासाठी पंधरा टीएमसी पाणी वर्षाला खर्च होते. विशेष म्हणजे पुण्यासाठी केवळ साडेअकरा टीएमसी पाणी मंजुर आहे. आता महापालिकेने साडेपंधरा टीएमसी पाण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

खडकवासला प्रकल्पावर नवीन मुठा उजवा कालवा, जनाई शिरसाई, पुरंदर उपसा सिंचन योजना अवलंबून आहेत. त्याशिवाय पुणे महापालिकेसह दौंड, इंदापुर, कुरकूंभ ग्रामपंचायतींना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होता. यामुळे दौंड, इंदापुर, पुरंदर, हवेली या दुष्काळी भागातील १ लाख २ हजार ३३३ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली आले आहे. मात्र शहराच्या सततच्या वाढत्या मागणीमुळे शेतीच्या पाण्यावर संक्रांत येत आहे.

या पार्श्‍वमूतीवर भूमिगत बोगद्यासाठी पाटबंधारे विभागाने काम सुरू केले आहे. खडकवासला धरणातून धायरी, कात्रज कोंढवा, उरूळी देवाची या मार्गे फुरसुंगी अशी बोगद्याची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.

हा बोगदा तब्बल २७ किलोमीटर लांब असणार आहे. खडकवासाला येथे हा बोगदा सुरू होऊन, फुरसुंगीला कॅनॉलला जोडण्यात येईल. त्यासाठी प्रत्येकी शंभर मीटर अंतरावर तीन संभाव्य साइटचा नकाशाही सुचविण्यात आला आहे. कात्रज पर्यंतच्या साडेदहा किलोमीटर परिसरात सतरा बोर घेण्यात आल्या असून, तेथील खडकांचे नमुने नाशिकच्या महाराष्ट्र इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूटला (मेरी) पाठविण्यात आले आहेत.

डोंगराळ भागातून व कमीत कमी नागरी वस्ती असलेल्या परिसरातून बोगद्यासाठी जागा निवडण्यात आली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.

होणार अडीच टीएमसी पाण्याची बचतः
खडकवासला ते फुरसुंगी असा ३४ किलोमीटरचा सध्याचा कॅनॉल आहे. पाणी गळती, बाष्पीभवन यामुळे बरेचसे पाणी वाया जाते. जल बोगदा झाल्यास वाया जाणार्‍या पाण्याला आळा बसणार असून, शेतीसाठी २.९१ टीएमसी पाणी अधिक उपलब्ध होणार आहे. पूर्व प्राथमिक अहवालानुसार या बोगद्यासाठी ८१६ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक देण्यात आले आहे.

- दै. लोकमत