श्रीनाथ म्हस्कोबा – कोडीत

समोरच असलेल्या पुरंदरची आडवी रांग, निसर्गरम्य असा भरपूर मोकळा परिसर, हिरवीगार वृक्षराजी यामुळे हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी भविष्यकाळात मंदिराभोवती सुशोभित उद्यानाचे नियोजन आहे.

नावः श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर

ठिकाणः कोडीत, सासवड

अंतरः सासवडपासून ९ किमी.

कसे जाल? सासवड कोडीत / गराडे बससेवा

चित्रदालन पहा

कोडित येथील श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांच्या मंदिराचे काम गेली १० वर्षे चालू आहे.

समोरच असलेल्या पुरंदरची आडवी रांग, निसर्गरम्य असा भरपूर मोकळा परिसर, हिरवीगार वृक्षराजी यामुळे हा भाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. भविष्यकाळात मंदिराभोवती सुशोभित उद्यानाचे नियोजन आहे. त्यामुळे हा भाग पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस येईल.

श्री तुळाजीबुवा बडधे यांच्या भक्तीला पावून श्रीनाथ म्हस्कोबा महाराज वीरहून कोडीतला आलेले आहेत. आज ज्या ठीकाणी मंदिर आहे. तेथील श्री जोगेश्वरीची ही मूर्ती जमिनीतून वर आलेल्या मुर्ती आहेत. येथे दर अमावस्येला श्रीनाथांच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होते. भक्तांना अन्नदान, भंडारा असतो.

मंदिराच्या २ एकर १ गुंठे क्षेत्रफळापैकी ५०,००० चौरस फुटात मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर पायापासून कळसापर्यंत पूर्णपणे दगडात बांधकाम केलेले आहे. शिखराची उंची ७१ फूट आहे. मुख्य मंदिरासमोर ४१ x ८१ फुटाचा सभामंडप असून सभामंडपासमोर १४ x १४ वाहन मंडप (नवसाई मंदिर) आहे. मंदिराचे प्रवेशद्वार – दिंडी दरवाजांची उंची ५१ फूट असून प्रवेशद्वारा खाली ३०,००,००० (तीस लाख) लीटर पाण्याची टाकी आहे.

प्रवेशद्वाराला दांडेली सागवानाचा लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे. लाकडी दरवाजावर अतिशय सुंदर असे कोरीव काम केले आहे. मंदिराच्या सभोवताली २७० x २१ फूट आणि १७१ x २१ फूट अशा ओवार्याग बांधलेल्या आहेत. ओवारीसह संपुर्ण मंदिरावर अतिशय सुंदर – सुबक नक्षीकाम करून मूर्ती बसविण्यात आलेल्या आहे. मंदिराचे काम करताना भारतातल्या बर्‍याच मंदिर शैलींचा वापर केला आहे. उदा. सोमपुरा शैली, दाक्षिणात्य शैली, द्रवीडी शैली, हेमाडपंथी शैली, महाराष्ट्रीयन शैली इत्यादी.

मंदिराचे संपूर्ण काम समस्त श्रीनाथ भक्तांच्या सहभागातून – ग्रामस्थांच्या श्रमदानातून साकारले आहे. श्रीनाथांवर अपार श्रद्धा असलेला समस्त श्रीनाथ भक्त, जर एकवटला तर तो काय करू शकतो हे पहायचे असेल तर आपणाला कोडितला यायलाच पाहिजे. कारण कोडित येथे साकारलेलं श्रीनाथांच भव्य-दिव्य मंदिर हे समस्त श्रीनाथ भक्तांच्या भावनांचे अपार श्रद्धेचे एक प्रतीक आहे. मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्याचा कार्यक्रम १ मे २००९ रोजी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडला.