कवी प्रकाश होळकर यांना अत्रे प्रतिष्ठानचा पुरस्कार

सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांच्या सासवड, ता. पुरंदर या जन्मगावी साहित्यातील योगदानाबद्दल देण्यात येणारा पुरस्कार लासलगावचे कवी प्रकाश होळकर यांना जाहीर झाला आहे.

रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याशिवाय पत्रकारितेसाठी ज्ञानेश महाराव यांना, तर कलावंतासाठी देण्यात येणारा पुरस्कार ‘मराठी बाणा’चे दिग्दर्शक अशोक हांडे यांना घोषित करण्यात आला आहे. गेल्या २१ वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने सदर पुरस्कार देण्यात येत आहेत. आचार्य अत्रे यांच्या ४३ व्या स्मृतिदिनी दि. १३ जून रोजी सासवड नगरपालिकेच्या अत्रे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रकाश होळकर यांचे ‘कोरडे नक्षत्र’, ‘मृगाच्या कविता’ हे काव्यसंग्रह असून, ‘रानगंधाचे गारुड’ हा ना. धों. महानोर यांच्या निवडक पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथही प्रकाशित झाला आहे.

होळकर यांनी आतापर्यंत ‘टिंग्या’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘सर्जाराजा’, ‘बाबू बॅँडबाजा’, ‘धूळमाती’, ‘चिनु’, ‘टपाल’, ‘नगारा’, ‘हरी पाटील’, ‘कामधेनू’ व ‘जागर’ या चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यातील टिंग्या, बाबू बॅँडबाजा या चित्रपटातील गीतांना शासनाचे उत्कृष्ट गीतलेखनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आजवर त्यांना विविध १८ पुरस्कार मिळाले आहेत.

- लोकमत