जेजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५ कोटी

‘‘तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकासासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विशेष फंडातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आम्ही पाच महिन्यांपूर्वी पालिकेच्या निवडणुकीत जेजुरीकरांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करू,’’ असा विश्‍वास काँग्रेसचे युवक नेते संजय जगताप यांनी येथे व्यक्त केला.

पालिकेच्या निवडणुकीनंतर प्रथमच जगताप यांनी जेजुरी नगरपालिकेत पालिकेतील विरोधी गटनेते गणेश निकुडे यांच्या कक्षात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. ‘‘पालिका निवडणुकीत आम्ही पॅनल उभे केले होते. निवडणुकीत आम्हाला अपयश आले असले, तरीही आमचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. शिवाय एक सहयोगी नगरसेवकही होऊ शकला. या सहा नगरसेवकांच्या माध्यमातून जेजुरीतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली, तरी राज्यात आमच्या पक्षाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत आहे. सत्ताधारी पक्षाबरोबरच त्यांच्यापेक्षा काकणभर जास्त विकासकामे शासनाकडून खेचून आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे,’’ असे जगताप यांनी सांगितले.

‘‘जेजुरीचा सासवड शहराप्रमाणे विकास करण्याचे आश्‍वासन आम्ही दिले होते. डिसेंबर २०११ मध्ये निवडणुका झाल्या. जानेवारीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन शहराच्या विकासासाठी निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनीही प्रतिसाद देऊन तब्बल ५ कोटींचा निधी त्यांच्याच विशेष फंडातून उपलब्ध करून दिला आहे. भविष्यात अजूनही मोठा निधी आणू. शहराचा चेहरामोहराच  बदलून टाकू,’’ असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

‘‘निवडणुकीपासून सत्ताधार्‍यांना विकासकामे करण्यासाठी वेळच मिळालेला दिसत नाही. लवथळेश्‍वर परिसराबरोबरच इतर प्रभागांतील विकासकामे लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासनाच्या वादात अडकली आहेत. विकासकामांबाबत चर्चा केली असता पालिकेकडे पैसे नसल्याची उत्तरे दिली जातात.

स्थानिक स्वराज्यसंस्था लोकांशी निगडीत आहेत. त्यांच्या भावनांशी कोणीही खेळू नये. दिलेला शब्द पाळावाच लागेल. त्यासाठी विकासकामे करावीच लागतील. मिळालेल्या निधीतून विकासकामे करून घ्या. त्या विकासकामांची उद्घाटनेही तुम्हीच करा. कामे अडवू नका,’’ असे आवाहनही जगताप यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्‍यांची नावे न  घेता केले. या वेळी पालिकेतील विरोधी गटनेते निकुडे, नगरसेवक अमोल सातभाई, दादा उबाळे, शोभा जगताप, सुरेखा माळवदकर, हेमंत सोनवणे, पंचायत समिती सदस्य दत्ता झुरंगे, तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पोमण, शहराध्यक्ष अनिल वीरकर, माजी नगरसेवक भारत निकुडे, रमेश गावडे, सुभाष खेडेकर आदी उपस्थित होते.

- लोकमत ता. २०-०६-२०१२