सोपानकाका देवस्थान

सासवडच्या पश्चिम दिशेस भोगावती (चांबळी) च्या पावनतीरी हे पुण्य पवित्र सोपानदेव मंदिर उभे आहे. हे मंदिर म्हणजे अध्यात्मज्ञानाचे महन्मगंल केन्द्रच.

Sopankaka Devasthanनावः सोपानकाका देवस्थान

ठिकाणः सासवड

अंतरः सासवडपासून १ किमी.

कसे जाल? सासवडहून रिक्षा उपलब्ध

चित्रदालन पहा

महाराष्ट्राची तद्वत भरतभूची त्रैलौक्य कीर्ती प्रसृत करणार्‍या आणि आणि वेदशास्त्रे व पुराणे यांची परंपरा अखंड ठेवणार्‍या संतश्रेष्ठात ज्ञानदेवादी बंधू ज्या भूमीवर जन्मले नि समाधिस्त झाले ती परम पवित्रच होय. अपार जडमूढांना आणि जीवजंतूना उद्धारण्यासाठीच श्री सोपानमहाराजांनी सासवड ग्रामी समाधी घेतली. या संतपुरुषांच्या समाधिप्रसंगानेच देवादिकांचे साधुसंतांचे चरण या भूमीला लागले. खरोखर सासवडवासी जन किती थोर व भाग्यवंत ! अशा या भूमीस महात्म्यांच्यामुळे पावनता लाभली ती विश्वजनिता सृष्टीकरता ब्रम्हावतार श्री सोपानदेवामुळेच.

सासवडच्या पश्चिम दिशेस भोगावती (चांबळी) च्या पावनतीरी हे पुण्य पवित्र सोपानदेव मंदिर उभे आहे. हे मंदिर म्हणजे अध्यात्मज्ञानाचे महन्मगंल केन्द्रच. मंदिरात प्रवेश केला की, दर्शनी भागी पूर्वेस श्री नागेश्वराचे शिवमंदिर आहे. या मंदिराच्या पश्चिमेस भव्य नि प्रशस्त कीर्तन मंडप दिसतो. सरदार पानसे यांनी मराठे विरुद्ध हैदर संग्रामात मेळकोट येथे युद्धात विजय मिळवून भरपूर लुट मिळवली. त्या वेळी त्यांनी सुंदर लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि विष्णूच्या देवालयाचे चंदनाचे सुबक स्तंभ लुटीत बरोबर सोनोरीस आणले. हे चंदनाचे सहा कोरीव खांब भूतकाळातील समृद्ध कलेची साक्ष देतात आणि वारकर्‍यांच्या शौर्याची ग्वाही देतात.

कीर्तनमंडपानंतर मंदिरात लहानसा प्राकार आणि मध्य गाभार्‍यात दक्षिण भागी श्री विठ्ठल रुक्मिणीची कृष्ण पाषाणी सुंदर मूर्ती आहेत. तसेच वामांगी राम-लक्ष्मण व सीता या त्रयींच्या संगमरवरी मनोहर मुर्ती स्थापिलेल्या आहेत. गर्भागारात संतश्रेष्ठ सोपानदेवांची नितांन्त, मनोहर समाधी असून पार्श्वभागी गोपाळकृष्णाची उभी मुर्ती आहे.

समाधीच्या दर्शनी भागी पूर्व बाजूस समाधीसन्निध लहानसे कुंड असून मार्गशीर्ष वद्य १३ स समाधी कालाप्रसंगी जान्हवी सोपानदेव भेटीस अवतीर्ण होते. अशी भाविकांची लोकाख्यायिका आहे.

समाधीच्या दक्षिण भागी एक विस्तीर्ण असा जुना चिंचेचा वृक्ष असून तिथे सोपानदेवाच्या पादुका आहेत. तेथून समाधिस्थळी सोपानमहाराजांनी प्रवेश केल्याचे सांगतात. मंदिर प्राकारात दत्तमंदिर आहे. मंदिरातील प्राकार विस्तृत आहे. दोहोबाजूस भाविक यात्रेकरुंसाठी ओवर्‍यांची सोय आहे. जुन्या मंदिराच्या कळसाचा जीर्णोद्धार भागवत सांप्रदायाचे प्राण वै. ह. भ. प. सोनोपंत तथा मामासाहेब दांडेकर यांच्या हस्ते झाला. जुन्या मंदिराचे रूप पालटून आता सुंदर नि प्रशस्त मंदिरात रुपांतर झाले आहे.

मंदिराचे बाहेरील बाजूस पर्वेकडे पावन भोगावती तीरावर भागीरथी नामक पवित्र तीर्थकुंड आहे. आषाढी यात्रेस पंढरीस जाताना ज्ञानभास्कर ज्ञानदेवांची पालखी वैष्णवांच्या दिंड्याच्यासह सासवडी सोपानदेवास पंढरीस न्यावयास येते त्या वेळी खंडोबाचा विस्तीर्ण माळ आणि सोपानदेव मंदिर टाळ मृदृंगाच्या गजरांनी नामसंकीर्तनाने दुमदुमून जाते. सोपानदेवांची पालखी मोठ्या सोहळ्याने पंढरीला विठ्ठल भेटीस जाते. आपल्या ह्या लाडक्या बंधुस पंढरीहून सासवडी ज्ञानदेव पोचवून स्वस्थानी अलंकापुरीस प्रयाण करतात.