पांडेश्वर मंदिर

अभ्यासकांच्या मते तब्बल सोळाशे वर्षापूर्वीचे हे मंदिर, पांडव कालीन किंवा पांडवानी एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याने या क्षेत्राला पांडेश्वर असे म्हणतात’ अशी लोकधारणा आहे.

pandeshwar templeनावः पांडेश्वर मंदिर

ठिकाणः - पांडेश्वर

अंतरः सासवडपासून २५ किमी.

कसे जाल? जेजुरी बससेवा

मुळचे चैत्यगृह नंतरचे शिखर, दगडी मुखमंडप, नदीकाठचा तट लगतच्या ओवा-या, मराठा कालीन भित्तीचित्रे , रंगकाम आदी बाबींमुळे सोळाशे वर्षातील मंदिर रचनेतील बदलांचा आलेख दर्शवणारा ठेवा म्हणून इतिहास संशोधक व अभ्यासक याकडे पाहतात.

कऱ्हा नदीवर बांधलेल्या घाटावर हे पुर्वाभिमुख मंदीर आहे. या मंदिराची रचना मुखमंडप, अंतराळ, मंडप, गर्भगृह अशी असून मुख मंडपाचे काम दगडी असून कलाकुसरी युक्त आहे या कामावर चालुक्यशैलीची छाप जाणवते या मागील मुख्य मंदिर हे मोठ्या विटा वं चुण्यामध्ये बांधलेले आहे. हे काम मुळात चैत्याचे असून ते तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील असावे असे जाणकार सांगतात. याचे गीलाव्याचे काम इस. ११९६ मध्ये झाल्याचे मंदिरातील गिलार्यावरील लेखातून समजते. गर्भगृहात एका आसनावर भव्य शिवलिंग आहे. वनवासात असताना पांडवांनी हे लिंग स्थापन केल्याची जनश्रुती आहे. याच यज्ञासाठी गंगाजल  आणण्यासाठी चतुर्मुखावर ध्यानस्त असलेल्या ब्रम्हादेवांचा कमंडलू पांडवांनी लवंडला व त्या पासून कऱ्हा नदीची निर्मिती झाल्याचे मानले जाते. मंदिरावरील कळसाचे वं परिसरातील ओवरीचे काम १८ व्या शतकातील वाटते मंदिराचे दक्षिणेस एक गणपती घुमटी आहे त्या मध्ये गणपती मूर्ती शेजारी गणेशपद आहेत यामुळे या क्षेत्रास गणेशगया ही म्हंटले जाते, येथेच पांडवांनी पितृश्राद्ध केल्याचे ही सांगतात. मुख मंदिरामागील ओवरीत शक्तीची प्रतिमा म्हणजेचं पार्वतीची प्रतिमा आहे.

भाविक भक्तांसाठी भव्य शिवलिंग तर पर्यटकांसाठी शिल्प व वास्तुरचना यांचे आकर्षण आहे. ४३ बाय २३ बाय ७.५ सेंटीमीटर आकारांच्या विटांचे बांधकाम आपणास खूप काही सांगून जाते. मंदिरातील लंबगोलाकृती गाभारा व त्या पुढील गजपृष्ठाकार व आयताकृती छताचा सभा मंडप व जुन्या विटांचा वापर, उत्कृष्ठ गिलावा संशोधकांच्या दृष्टीने मोलाचा ठरला आहे. दगडी मुख मंडपाच्या बाहेरील पाच फुटी द्वारपालांची शिल्पे तसेच मंडपात २४ व बाहेर २ अशी देकोष्ठ पाहण्यासारखी आहेत. सूर सुंदरी व देवतांची शिल्पेही येथे आहेत जालवातायने, प्रवेश द्वाराच्या मधोमध मंदारक, भिंतीच्या पायाशी असणारी धर्म-यश नक्षी या सा-या गोष्टी कोरीव लेण्यांसारख्या आहेत.

मंदिराच्या विविध स्थापत्यशैलीचा मिलाफ असलेले हे मंदिर आवर्जून पाहिलेच पाहिजे.

सौजन्य: jejuri.in आणि khandoba-jejuri.blogspot.in