कुसुमाग्रज, सावरकर अन्‌ लिंकनचीही पत्रे

सासवड - येथील प्रगती ग्रंथालयाच्या वतीने नगरपालिका सभागृहात विविध मान्यवरांच्या पत्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. परिसरातील रसिक वाचकांचा या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, अब्राहम लिंकन आदींच्या पत्रांचा समावेश होता.

ग्रंथालयाचे संचालक तानाजी सातव यांनी या दुर्मिळ पत्रांचा संग्रह केला आहे. त्यांच्याच वाढदिवसाचे औचित्य साधून सुमारे सव्वातीनशे पत्रांचा समावेश असलेल्या या पत्रांचे एकदिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्‌घाटन बॅंक ऑफ इंडियाचे अधिकारी हेमंत ताकवले यांच्या हस्ते झाले. हरेश्‍वर पतसंस्थेचे अध्यक्ष संजयनाना जगताप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. संजय भागवत, प्राप्तिकर विभागातील वरिष्ठ अधिकारी मोहन साळवी, शिक्षक नेते तुकाराम मेमाणे, सासवड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, प्रा. अमोल जगताप आदी या वेळी उपस्थित होते.

सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आनंदीबाई जोशी, जवाहरलाल नेहरू, आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, भालजी पेंढारकर, संताजी घोरपडे, कुसुमाग्रज, जयप्रकाश नारायण, यशवंतराव चव्हाण, नारायण सुर्वे, डॉ. आनंद यादव, प्राचार्य शिवाजीराव भोसले, शांता शेळके, व. पु. काळे, सुरेश भट, शरद पवार, डॉ. अब्दुल कलाम, राजीव गांधी, बाबा महाराज सातारकर, टी. एन. शेषन, एस. एम. जोशी आदी अनेकांची पत्रे प्रदर्शनात मांडण्यात आली होती. याशिवाय अब्राहम लिंकनच्या पत्रांच्या प्रतीही प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जगताप यांनी केले. संयोजन श्री. सातव यांच्यासह अभिजित माने, सुरेश कोडीतकर, दादा जगताप केले.

- सकाळ