चांगवटेश्वर

सासवड-किल्ले पुरंदर मार्गावर श्री. वटेश्वर हे पुराणप्रसिद्ध जागृत स्वयंभू शिवालय आहे. निसर्गरमणीय व आल्हादायक परिसरात प्राचीन अप्रतिम शिल्पाची साक्ष देत असलेले हे मंदिर अनादी स्वयंभू शंकराची महान पवित्र तपोभूमीच आहे.

Changawateshwarनावः चांगवटेश्वर

ठिकाणः सासवड

अंतरः सासवडपासून १ किमी.

कसे जाल? सासवडपासून रिक्षा उपलब्ध

चित्रदालन पहा

” रम्य करा मूर्त शंभू | सासवडी हा स्वयंभू ”
सासवड-किल्ले पुरंदर मार्गावर श्री. वटेश्वर हे पुराणप्रसिद्ध जागृत स्वयंभू शिवालय आहे. निसर्गरमणीय व आल्हादकारक अशी पार्श्वभूमी असलेल्या परिसरात प्राचीन अप्रतिम शिल्पाची साक्ष देत असलेले हे मंदिर अनादी स्वयंभू शंकराची महान पवित्र तपोभूमीच आहे. चराचराला वेड लावणारे असे जागृत स्थान कर्‍हामाईच्या तीरावर पतितांचा उद्धार करण्यासाठी सदैव सिद्ध राहिले आहे.

अशा या पावित्र्याने युक्त असलेल्या स्थळाचे सौंदर्यही अप्रतिम आहे. रम्य कर्‍हा नदीच्या तीरावर मनाला वेड लावणारे, डोळ्यांना सुखावणारे भव्य वटवृक्ष, सौंदर्ययुक्त लता, यामुळे मोर, कोकिळा यांनीही आपले वास्तव्य येथेच सदैव केले आहे. मयुरांच्या केका, कोकिळेच्या मधुर गायनाने, त नि कष मनाला घेऊन सुखविणार्‍या श्री. शंकराच्या पवित्र स्थानाकडे जडमुठांना अलिप्त करण्याची नैसर्गिक किमयाच तिथे भगवान शंकराची सदैव सेवारत झाली आहे.

प्राचीन काळी ही सिद्धसाधकांची तपोभूमी होती. याच स्थळी ब्रम्हदेवाने श्रीशंकराची आराधना केली. गहन तपाने संतुष्ट होऊन कैलासपती त्यास प्रसन्न झाले. “महातीर्थे व्रत दैवते | ब्रह्मा झाला निर्मिते ते हे स्थळ |”

श्री क्षेत्र सासवड नि वटेश्वर स्थळ म्हणजे देव, भक्त नि तीर्थ यांच्या भेटीच्या अपूर्व सोहळ्याचे पवित्र स्थळ होय. श्री वटेश्वर स्थलासन्निधच एक पापहारक नि शुभंकर असे सुंदर पवित्र तीर्थकुंड आहे. हे तीर्थकुंड कर्‍हामाईच्या पवित्र जलाशयांत असून कर्‍हामाईने श्री वटेश्वराला उजव्या बाजूने प्रदक्षिणा करुन मगच पुढे निजमार्ग आक्रमला आहे. ह्या पवित्र कुंडामुळे मंदिराच्या सौंदर्यात भरच पडली आहे.

प्रथम या मंदिरास ‘नीलकंठ‘ नामाभिधान होते. नंतर त्यास ‘वटेश्वर’ संबोधण्यात येऊ लागले. ज्ञानेश्वरकालीन महान योगीराज चांगदेव यांच्या बालपणापासून बराच काळ श्रीवटेश्वराच्या सान्निध्यात गेला. चांगदेवांचे माता-पिता त्यांच्या बालपणीच निवर्तल्याने त्यांचे पालनपोषण व वर्धन श्रीवटेश्वराने केले. नंतर चांगदेवांनी तपश्चर्या-तीर्थाटने केली. ते योगविद्याविशारद झाले मुक्ताईने त्यांना दीक्षा दिली. ‘चांगा सोयधरी ज्ञान वटेश्वरी| मुक्ताई जिव्हारी बोध करी||’ अशा रितीने चांगदेव वटेश्वराशी एकरुप झाल्याने या शिवालयास पुढे ‘चांगा वटेश्वर’ असे नामाभिधान प्राप्त झाले व त्याच नावाने ते आजही प्रचलीत आहे.

भारतीय प्राचीन स्थापत्यशास्त्र आणि अप्रतिम शिल्पकला यांचा उत्कृष्ट नमुना असलेले वटेश्वर मंदिर पुर्वाभिमुखी असून प्रवेशद्वारातून प्रवेश केला की, आतील बाजूस प्रशस्त चौकोनाकृती दगडी प्राकार लागतो, मंदिराच्या सभामंडपाचे दगडी बांधकाम अप्रतिम आहे, तीस चौकोनी अखंड पाषाण स्तंभावर सभामंडपात उभा आहे. प्रवेशद्वारावरील स्तंभावर तपस्वी, दधि-मंथन करणारी स्त्री, गरुड, युगुल, लढत असलेले मल्ल, तीन नर्तकी असे शिल्प कोरलेले आहे. त्याच बरोबर चित्रविचित्र, आकर्षक, गोलाकार सौन्दर्याकृती, कमल पुष्पे, शृंखलांच्या माला, नृत्यांगना यांचे सुबक व कोरीव काम केलेले दिसते. मानवी जीवनाच्या निरनिराळ्या प्रसंगातील भावनांचा उत्कृष्ट रसाविष्कार करण्याचा नयनरम्य कलाकृती तद्वतच गेंडा, अश्व, व्यार्घ, गजादी पशूंची चित्रे, पोपटासारखे पक्षी यांचे स्तंभावरील शिल्पकला रसिकाला मंत्रमुग्ध करते. सभामंडपाच्या मध्यभागी विशाल, भव्य, घोटीव व देखणी नंदीची मूर्ती असून नंदीच्या कंठस्थानी साजरशृंगार कोरलेला आहे.

सभामंडप ओलांडला की, चौकोनाकृती मध्य गाभारा लागतो. शोडष स्तंभावर हा उभारलेला असून त्याच्या प्रत्येक स्थंभावर प्रवेशमंडपाप्रमाणेच विविध कलाकुसरयुक्त चित्राकृती, कमल पुष्पे, शृंखलांची घडण कोरलेली आहे. मंडपास दक्षिणोत्तर प्रवेश द्वारे आहेत. शिवालयाचे गर्भागार नितांतरम्य, उदात्त नि पवित्र आहे. त्यामुळे भाविक भक्तांच्या मनास सात्विक उदात्ततेचा अनुभव येतो. स्वयंभू शिवलिंगाच्या पार्श्वभागी महिरपीच्या कोनाड्यात श्री गणेश देवतेची संगमरवरी रम्य मूर्ती आहे. गर्भागारातील प्रत्येक पाषाण भिंतीस लहान कोनाडे आहेत. मंदिराचा घुमट अष्टकोनी गोलाकार आहे. देवालय प्राकाराच्या पश्चिमेस भाविक यात्रेकरुसाठी सारख्या आकाराच्या विटांच्या ओवार्‍या आहेत. मंदिराचे दक्षिणेस लहान मोठी देवालये आहेत. पूर्व प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दोन कृष्णपाषाणी भव्य दीपमाला आहेत. उत्तरेस पावन कर्‍हा तीरावर सखाराम बापू बोकिलांनी बांधलेला घाट दिसतो. अशा पुण्यपावन पवित्र शिवालयाचे दर्शन भाविकजनास घडले की त्यांच्या मुखातून सहज प्रशंसोद्गार निघतात.

हे सुद्धा वाचा
श्री. चांगवटेश्वर देवस्थान सुधार समिती…