भैरवनाथ मंदिर

श्री क्षेत्र काशी येथील जागृत आणि जाज्वल्य शिवगण देवता कालभैरवनाथाचे हे स्थान असून सुमारे तीनशे वर्षापासून भक्तांच्या परम विशुद्ध भावनेने येथे स्थापन झालेले हे मंदिर अष्टभैरवनाथापैकी  एक महत्चाचे मंदिर आहे.

नावः भैरवनाथ मंदिर

ठिकाणः सासवड

अंतरः सासवडपासून १ किमी.

कसे जाल? सासवडपासून रिक्षा उपलब्ध

श्री क्षेत्र काशी येथील जागृत आणि जाज्वल्य शिवगण देवता कालभैरवनाथाचे हे स्थान असून सुमारे तीनशे वर्षापासून भक्तांच्या परम विशुद्ध भावनेने येथे स्थापन झाले आहे. अष्टभैरवनाथापैकी “कालभैरवनाथाला” महत्वाचे स्थान आहे. सरदार पुरंदरे यांच्या विशाल वाड्याच्या दक्षिणेस असलेले हे मंदिर सासवडचे प्रमुख असे दैवत म्हणून ओळखले जाते.
दक्षिणाभिमुखी मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केला की, मंदिराभोवती दगडी प्राकार लागतो, आतील मंडप दगडी असून त्यास तीन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या गर्भगारात श्री कालभैरवनाथाची कृष्णपाषाणाची सुबक मनोहर मुर्ती वामांगी असून मध्यभागी भैरवनाथ, दक्षिण बाजूस जोगूबाईचे मूर्ती आहे. गर्भगारातील वातावरण पवित्र व उदात्त आहे. नंदादीपाच्या प्रशांत प्रकाशात मूर्तीची शोभा खुलून दिसते. प्राकारामध्ये प्रदक्षिणा घालताना श्री गणेश, दत्तात्रेय, गोरकनाथ इत्यादी देवतांच्या मुर्तींचे भाविकांस दर्शन घडते. पुर्व बाजूस होमकुंडाची खोली असून त्या ठिकाणी नवग्रहांच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे. दक्षिण बाजूस प्राकारात कृष्णपाषाणाच्या दोन दीपमाला आहेत. प्रवेशद्वाराशी तीन दीपमाला आहेत.

अवर्षण काळी पर्जन्यासाठी कौल लावण्यात येतो. त्याची प्रचीती तंतोतंत येते. हे देवाचे सत्व आहे. समस्त ग्रामस्थांची मंदिराचे ठायी नितांत श्रद्धा भक्ती असल्याने चैत्री, जन्माष्टमी व दसरा असे सण, धार्मिक समारंभ, उत्सव मंदिरात उत्साहाने व थाटाने साजरे होतात. हे सासवडगावचे गौरवशाली भूषणच आहे.